पिंपरी (Pclive7.com):- महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून तीन लाख १० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. रविवारी (दि.२१) इंडोरन्स चौकात ही कारवाई करण्यात आली.
चंद्रकांत ऊर्फ बाळू हरिचंद्र घोलप (३६, रा. आळंदी, ता. खेड. मूळ रा. चिंचवडगाव, ता. वडवणी, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन चोरी होणाऱ्या ठिकाणी पेट्रोलिंग आणि नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार, महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी इंडोरन्स चौकात नाकाबंदी लावली होती. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून संशयितरित्या जात असताना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, आरोपी पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. आरोपीकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले. तसेच, आणखी सहा दुचाकी चोरल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी तीन लाख दहा हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास गोसावी यांच्या पथकाने केली.