पिंपरी (Pclive7.com):- अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. आता राष्ट्रवादीत सर्वाधिक समर्थक कुणाचे याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. मुंबईत अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही या गटांची स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे. दरम्यान पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसने अजितदादा पवार यांना पाठिंबा दिला आहे. शहरातील माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आज (दि.०५) सकाळी मुंबईकडे रवाना झाले आहेत.
आज मुंबईत होणाऱ्या बैठकीला जास्तीत जास्त आमदार, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे म्हणून पक्षाध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर अजित पवार गटाने वांद्रे येथील भुजबळ यांच्या संस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित केली आहे.
पिंपरी चिंचवडमधून अजितदादा पवार यांच्या बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू मिसाळ, भाऊसाहेब भोईर, श्याम लांडे, राहुल भोसले, माजी नगरसेवक संजय वाबळे, मोरेश्वर भोंडवे, समीर मासुळकर, राष्ट्रवादी युवकचे विशाल वाकडकर, यश साने, प्रदिप तापकीर, श्याम जगताप, फजल शेख, इखलास सय्यद, सुशील मंचरकर, अक्षय माछरे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले आहेत.