पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात बीआरटीएस रस्त्याचे जाळे आहे. या मार्गावरून आरटीएस सुरळीतपणे सुरू आहे. परंतु बीआरटीएस मार्गात इतर खासगी वाहने घुसखोरी करत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बीआरटीएस मार्गातील खासगी वाहनांची वाहतूक रोखण्यासाठी बीआरटीएस मार्गामधील सिग्नल पॉइंटवर टेबल स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.
नाना काटे यांनी बीआरटीएस विभागाला यासंदर्भात लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, बीआरटीएस मार्गातून सर्रास खासगी वाहतूक सुरू आहे. सिग्नलच्या जवळ बीआरटीएसचा सिग्नल सुटला की डाव्या व उजव्या बाजूने नागरिक अनावधाने टर्न घेतात. खासगी वाहने या मार्गातून वेगवान प्रवास करतात. त्यामुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. खासगी वाहनांना बीआरटीएसमध्ये प्रवेश नसताना वाहनचालक घुसखोरी करत आहेत. त्यामुळे बीआरटीएस प्रशासनाने यावर कारवाई करावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे. तसेच बीआरटीएस मार्गामधील सिग्नल पॉइंटवर टेबल स्पीड ब्रेकर बसविण्यात यावेत. यासाठी संबंधित विभागाला त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.