पिंपरी (Pclive7.com):- शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे भाजपा सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांच्यामधील राजकीय ‘आखाडा’ आता रंगात आला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ‘शिरुरचा खासदार’ असे फ्लेक्स उभारुन आमदार लांडगे यांच्या समर्थकांनी खासदार गटाला खुले आव्हान दिल्याची चर्चा रंगू लागली आहे.
आमदार महेश लांडगे यांचा वाढदिवस भोसरीसह शिरुर लोकसभा मतदार संघात विविध उपक्रमांनी मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. वास्तविक, आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे गटाने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला. मात्र, फ्लेक्स आणि विविध प्रसारमाध्यमांतील जाहिरांतींमध्ये आमदार लांडगे यांच्या नावाचा उल्लेख ‘भावी खासदार’, मंत्रीसाहेब, शिरुरचा खासदार…असा करण्यात आला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आगामी लोकसभा निवडूक डोळ्यांसमोर ठेवून आमदार लांडगे यांनी राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आता खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे नेते मंगलदास बांदल यांच्यासह शिवसेना, काँग्रेस तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी आमदार लांडगे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पाठींबा दिला आहे. त्यामुळे सहाजिकच आगामी लोकसभा निवडणुकीत आमदार लांडगे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची डोकेदुखी ठरणार असल्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे-नाशिक महामार्ग, रिंगरोड, रेड झोन, बैलगाडा शर्यत, कचऱ्यापासून विजनिर्मिती प्रकल्प, औद्योगिक प्रश्न आदी विकासकामांवरुन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार महेश लांडगे यांच्या अनेकदा मतभेद झाले आहेत. नागरिकांच्या अपेक्षा लक्षात घेवून आमदार लांडगे यांनी नवखे असतानासुद्धा खासदारांना चांगलेच आव्हान दिले आहे. वास्तविक, केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानेच आमदार लांडगे यांना ताकद दिली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांचा वाटा मोलाचा आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार लांडगेंना ताकद…
शिरुर लोकसभा मतदार संघासाठी सध्यातरी भारतीय जनता पक्षासह सर्वपक्षीय आढळराव पाटील यांच्या विरोधकांसमोर एकही प्रभावी चेहरा नाही. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील हे स्वत: लोकसभा निवडणुकीसाठी जोखीम घेणार नसल्याचे सांगितले जाते. आढळराव यांना खुले आव्हान देण्याची तयारी आमदार लांडगे यांनी ठेवली आहे. त्यामुळे भविष्यातील तजवीज म्हणून भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी आमदार लांडगे यांना ‘प्रमोट’ केले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. परिणामी, बैलगाडा शर्यतीवरील आंदोलनाचा रोख राज्य सरकारवर येणार नाही, याची पुरेपूर काळजी घेत आमदार लांडगे यांनी ‘पेटा’ विरोधात एल्गार पुकारला होता. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीही आमदार लांडगे यांना कायम झुकते माप दिले आहे.