पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदार संघामध्ये संरक्षण विषयी अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये रेडझोन, बोपखेल येथील संरक्षण विभागाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्या बाबत, मावळ येथील मिसाईल प्रकल्प व उरण येथील नेव्ही सेन्सिटिव्ह झोन असे अनेक प्रश्न रखडलेत. या संदर्भात खासदार बारणे यांनी संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांची दिल्ली येथे त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली.
यासंदर्भात खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलयं की, पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोनची हद्द कमी करण्याबाबत अनेक वेळा संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा या प्रश्नांबाबत करत आहे. काल संरक्षणमंत्र्यांची भेट घेवून या प्रश्नांचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून देऊन तत्कालीन संरक्षण मंत्री व मनोहर पर्रीकरांच्या बरोबर झालेल्या बैठकीचा वृत्तांतही दिला. तसेच बोपखेल पुलाच्या प्रश्नाबाबत काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालायाने संरक्षण खात्याच्या जागेतून रस्ता करण्यास मान्यता देऊ नये असा निकाल एका याचिकेच्या दरम्यान दिला असल्याने हा प्रश्न अधिक जटील झाला आहे. या बाबत लक्ष घालण्याची विनंती करून मावळ येथील मिसाईल प्रकल्पासाठी अधिगृहण केलेल्या जमिनीच्या शेतकऱ्यांबरोबर बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. या प्रश्ना संदर्भात लोकसभेतही तारांकित प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले. तसेच उरण येथील नेव्हीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या सेन्सिटिव्ह झोन मधील हद्द कमी करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे खासदार बारणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.