पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने मालमत्ताकरावरील विविध सवलतींचा लाभ घेत तब्बल साडेतीन लाखांहून अधिक करदात्यांनी तब्बल ४०० कोटींहून अधिक कराचा भरणा केला आहे. यामध्ये तीन लाख २५ हजार नागरिकांना आपला चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर भरून थकीत कराचासुद्धा भरणा केला आहे. करसंकलन विभागाने आवाहन केल्यानुसार, नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने कर भरून तब्बल २८५ कोटींचा ऑनलाइन पद्धतीने कर भरला आहे. आता मालमत्ताकरावरील सवलतींचे अवघे दोनच दिवस बाकी असून नागरिकांनी मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले आहे.
सुट्टीच्या दिवशीसुद्धा कॅश काउंटर आहेत सुरू..
मालमत्ताकरावरील सवलतींचा शनिवार, २९ जून व रविवार, ३० जून रोजी सुट्टीच्या दिवशीसुद्धा कॅश काउंटर सुरू ठेवण्यात आले आहेत. सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.०० पर्यंत कॅश काउंटर सुरू असणार आहेत. नागरिकांनी मालमत्ताकरावरील सवलतींची संधी चुकवू नये, असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे.
अशा आहेत सवलती…
१) ३० जूनपूर्वी मालमत्ताकराची रक्कम ऑनलाइन स्वरूपात भरल्यास १० टक्के
२) फक्त महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी मालमत्तेच्या सामान्य करावर ३० टक्के
३) पर्यावरणपूरक इमारती/सोसायट्यांसाठी,
– कंपोस्टिंग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा संकल्पना राबविणाऱ्या इमारतींमधील निवासी मालमत्तांना ५ ते १० टक्के
– ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १५ टक्के
४) दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५० टक्के
५) स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नी यांच्या एका निवासी घरास ५० टक्के
६) इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले असणाऱ्या मालमत्तेस २ टक्के
७) संरक्षण दलातील शौर्यपदकधारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात १०० टक्के
नागरिकांनी त्वरित कर भरून सवलतींचा लाभ घ्यावा!पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने जाहीर केलेल्या घसघशीत सवलतींचा शहरातील साडेतीन लाखांहून अधिक करदात्यांनी लाभ घेतला आहे. ज्या नागरिकांना अद्याप मालमत्ताकराचा भरणा केला नाही, अशांसाठी सवलतींचे दोनच दिवस बाकी आहेत. त्यासोबतच सुट्टीच्या दिवशीसुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी कॅश काउंटरसुद्धा सुरू आहेत. नागरिकांनी त्वरित कर भरून सवलतींचा लाभ घेऊन शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.– नीलेश देशमुख,सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका