पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष नितिन रासकर यांनी अध्यक्षपदाचा ठरवलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदावर संजीवकुमार शांताराम बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड, मावळ, चाकण पट्ट्यात फुलशेती करणारे हजारो शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना पिंपरी-चिंचवड येथील फुल मार्केट हे हक्काचे व्यासपीठ आहे. अलीकडेच सुरु करण्यात आलेल्या या फुल मार्केटच्या माध्यमातून हजारो गोरगरीब शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शहरातील अशा या महत्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदाची धूरा आता संजीवकुमार बोडके यांच्या खांद्यावर आली आहे.
असोशिएशनचे मावळते अध्यक्ष नितिन रासकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ समाप्त झाला होता. कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा संघटनेकडे दिला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. तसेच बैठकीतील ठरावानुसार पुढील अध्यक्ष म्हणून संजीवकुमार शांताराम बोडके यांची फुलबाजार आडते संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
फुलबाजार आडते संघ पिंपरीचे उपाध्यक्ष शहाजी राक्षे यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. सचिव संतोष जाधव, वरीष्ठ सल्लागार राजकुमार मोरे, दत्तात्रय फुले, शिवाजी सस्त यांनी संजीवकुमार बोडके यांना निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. बोडके यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मावळ, हवेली, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.