वाकड (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील मुलांच्या व तरुण पिढीच्या कौशल्याला वाव देण्यासाठी तसेच त्यांना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी राम वाकडकर तसेच मॅच डे अरेना वाकड आणि द रिंग रिसर्च स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वाकड ऑलिंपिक या सर्वांत मोठ्या खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये 13 प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला असून 18 वर्षाखालील आणि 18 वर्षाच्या वरील सर्ववयोगटातील व्यक्ती यामध्ये सहभाग घेऊ शकतात विजेत्या स्पर्धकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
दिनांक: 29 जून 2024 ते 28 जुलै 2024 पर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी ही स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये वाकड, ताथवडे, पुनवळे सह आजूबाजूच्या गावातील सर्व वयोगटातील मुल, मुली, स्त्री, पुरुष, वयोवृध्द लोक सहभागी होवू शकतात. मुलांमध्ये खेळांविषयी आवड व जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील अशा तेरा प्रकारचे खेळ या उपक्रमात खेळले जाणार आहेत. त्यामध्ये सामूहिक व मनोरंजनात्मक खेळ याचाही समावेश आहे. मुलांच्या व तरुण पिढीच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून वाकड ऑलिंपिक ही स्पर्धा राबविण्यात आलेली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240629-WA0015-300x200.jpg)
हा उपक्रम पूर्ण महिनाभर चालणार आहे. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी हे खेळ ठेवण्याचा उद्देश म्हणजे या दिवशी शाळांना सुट्टी असते. त्यामुळं सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या मुला-मुलींना या मैदानी खेळांचे आवड निर्माण होऊन डिजिटल जाळ्यातून ते थोडे बाहेर येतील हा आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240630-WA0005-300x200.jpg)
रामभाऊ वाकडकर या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी म्हणाले की, आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य संपत्ती आहे. आजकाल मोबाईल, टॅब, लॅपटॉप, इंटरनेट याच्या विळख्यात आजची मुले आणि तरुण पिढी सापडली आहे. त्यांना त्यांच्या कौशल्याची जाणीव व्हावी व या खेळाच्या माध्यमातून त्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच आजकाल सोशल मीडियामुळे तसेच बैठे जीवनपद्धती आणि धकाधकीची शालांत पद्धती यामुळे मुलांमध्ये मैदानी खेळ तसेच अनेक खेळांमध्ये रुची कमी होऊन मोबाईलचा अतीवापर त्यांच्यामध्ये वाढताना दिसत आहे. यामुळेच.. हार्ट अटॅक, शुगर, ब्रेन स्टॉक, लठ्ठपणा अशा अनेक आरोग्याच्या समस्या आणि याचे प्रमाण लहानपणामध्येच मुलांमध्ये वाढत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब बनलेली दिसते. सुदृढ आरोग्यासाठी व मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्यामध्ये खेळाचे रुची निर्माण होईल आणि यातूनच पुढे ते मोठे खेळाडू घडतील अशी आशा बाळगून रामभाऊ वाकडकर यांच्या सोशलमीडिया फाउंडेशन मार्फत वाकड ऑलिंपिक पिंपरी चिंचवड मधील ही सर्वांत मोठ्या खेळांची स्पर्धा आयोजित केली आहे.
![](http://pclive7.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240630-WA0004-300x200.jpg)
दिनांक 28 जून 2024 रोजी याचे उद्घाटन झाले असून 800 खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला आहे. या उद्घाटनासाठी- पद्मश्री मुरलीकांत पेटकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनीताई जगताप, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, नाना काटे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेविका ममता गायकवाड, विक्रम वाघमारे, गणेश कस्पटे, सोमनाथ धोंडे, सिध्दार्थ गायकवाड, कुणाल ओव्हाळकर, प्रणाली बागुल, तेजस्विनी ढोमसे, अजित शर्मा, सुरज भुजबळ, प्रमोद भुजबळ, सनि भुजबळ आदि उपस्थित होते. या मान्यवरांनी देखील खेळाविषयी आणि आरोग्य विषयी मत व्यक्त केले.
इथून पुढे 28 जुलै 2024 पर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी या खेळांचे आयोजन केले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने तरुण मुला मुलांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. तसेच या सर्वासाठीचे साहित्य तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. ही स्पर्धा मोफत असून सर्व वयोगटातील व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील रामभाऊ वाकडकर स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्यामार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या खेळासाठी प्रतिष्ठित व अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन लाभणार असून या स्पर्धेमुळे अनेक खेळाडू तयार होतील व तरुण पिढीमध्ये खेळाडू वृत्ती जोपासली जाईल अशी आशा आहे.