पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र आता याच बालेकिल्ल्याला शरद पवार सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत. त्याच अनुषंगाने अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे समर्थकांनी आज शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माजी आमदार विलास लांडेंच्या सोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवकांसह पंधरा पदाधिकारीही शरद पवारांच्या तालमीत परतण्याची शक्यता आहे. लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत.
भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गव्हाणे ही लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. परंतु महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला की ठाकरेंच्या शिवसेनेला सुटणार, यावर पुढची भूमिका ठरणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि अनेक माजी नगरसेवक यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लवकरच अजित पवार गटात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक नगरसेवकांनी आज पवार साहेबांची भेट घेतली आहे. मात्र त्यांचा अद्याप प्रवेश झाला नाही. तसेच अनेक भाजपचे नगरसेवक देखील शरद पवार गटात प्रवेश करण्यात इच्छुक आहेत. लवकरच हे प्रवेश देखील होतील.– तुषार कामटे शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट.