रावेत (Pclive7.com):- रावेत-किवळे परिसरात बिबट्या दिसला असल्याची एक व्हॉट्सॲप पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये रावेत भागातील कोहिनूर ग्रॅंड्युर, फेलिसिटी आणि सिल्वर ग्रेशिया सोसायटी परिसरात बिबट्या आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ही अफवा असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेसाठी पालकांनी त्यांना घरातच डांबून ठेवण्यास सुरुवात केली होती. या अफवेच्या प्रभावामुळे नागरिक रात्री घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत होते. काहीजण तर दिवसाही बाहेर जाण्यास घाबरत आहे.
दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, या भागात बिबट्याचा कोणताही वावर आढळलेला नाही. ही पोस्ट केवळ अफवा असून नागरिकांनी अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर अशा अफवा पसरविणे चुकीचे आहे आणि यामुळे समाजात अकारण भीती निर्माण होते. वनविभागाने नागरिकांना शांत राहण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. जर कोणी काही संशयास्पद हालचाल पाहिली तर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, असेही वन विभागाने सांगितले आहे.