पिंपरी (Pclive7.com):- यमुनानगर परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे. माजी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, माजी नगरसेविका कमल घोलप यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक १३ मधील यमुनानगर भागात २०१७ ते २०२२ या कालावधीत चोवीस तास पाणीपुरवठा योजनेंतर्गत अनेक नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. तसेच, जुन्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या होत्या. आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार अजूनही काही जलवाहिन्या बदलण्याची गरज आहे. त्याचे परीक्षण व पाहणी करण्यासाठी ए-२ झोन चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या सल्लागारांकडे हस्तांतरित करावा.
पर्यायाने चोवीस तास पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी सल्लागारांना काम करणे सोपे जाईल. तसेच, हा प्रकल्प लवकर सुरू होण्यास मदत होईल. पाणी ही नागरिकांसाठी मूलभूत सुविधा आहे. तरी, हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.