सांगवी (Pclive7.com):- कलाश्री संगीत मंडळातर्फे आयोजित कलाश्री संगीत महोत्सव येत्या १०, ११, १२ जानेवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे होणार असून, गायन, वादन व नृत्य अशी संपूर्णपणे कलेची अनुभूती देणाऱ्या या महोत्सवात रसिकांना सांगीतिक मेजवानीचा आस्वाद घेण्याचे आवाहन कलाश्री संगीत मंडळाचे संस्थापक ज्येष्ठ गायक सुधाकर चव्हाण यांनी केले आहे. किराणा घराण्याचे गायक स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या हस्ते सुरूवात झालेल्या या महोत्सवाचे हे 27 वे वर्ष आहे.
येत्या १० जानेवारी रोजी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर माई ढोरे, तर स्वागताध्यक्ष म्हणून अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार तानाजी सावंत, जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रिद्धी पोतदार यांचे भरतनाट्यम, पं. अतुल खांडेकर यांचे गायन, ईशान घोष यांचे तबला वादन होईल. दुसऱ्या दिवशी युवा गायक विराज जोशी यांचे गायन, सुप्रसिद्ध बासरी वादक पं. हिमांशू नंदा यांचे बासरी वादन आणि गायत्री जोशी यांचे गायन होईल.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पं. समीर सुर्यवंशी व शिष्य यांचे वादन, त्यानंतर गायिका शाश्वती चव्हाण यांचे गायन होईल आणि पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता होईल.
महोत्सवात हार्मोनियमवर पं. सुयोग कुंडलकर, अविनाश दिघे, माधव मारणे, गंगाधर शिंदे, अभिषेक शिनकर, लीलाधर चक्रदेव, अमेय बिचू साथ करतील. तसेच तबल्यावर पं. भरत कामत, प्रशांत पांडव, पांडुरंग पवार, अजिंक्य जोशी, किशोर कोरडे, तर पखवाजवर गंभीर महाराज साथ करतील, अशी माहिती सच्चिदानंद कुलकर्णी, समीर महाजन, प्रणाली विचारे, नंदकिशोर ढोरे, आदित्य जगताप यांनी दिली.
पं. गिरीष संजगिरी यांना यंदाचा स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ कलाश्री पुरस्कार :
कलाश्री संगीत मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा २७ वा ‘कलाश्री पुरस्कार’ लोकनेते माजी आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ पंडित गिरीष संजगिरी यांना माजी आमदार अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावर्षीचा स्व. शंकुतला नारायण ढोरे यांच्या स्मरणार्थ ‘कलाश्री युवा पुरस्कार’ प्रसिद्ध सतार वादक पं. मोशीन खान यांना प्रदान करण्यात येणार आहे.