‘दुर्ग भटकंती’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
पिंपरी (Pclive7.com):- “गड किल्ले यांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे.” असे विचार निवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ. माधवराव सानप यांनी रविवार, दि.०५ जानेवारी २०२५ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित एकदिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात ज्येष्ठ लेखक अरुण बोऱ्हाडे लिखित ‘दुर्ग भटकंती : जिंजी, वेल्लोर, तंजावर’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. माधवराव सानप बोलत होते.
ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे, लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद – पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, पिंपरी – चिंचवड महापालिका विज्ञान केंद्र संचालक प्रवीण तुपे, संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. माधवराव सानप पुढे म्हणाले की, “इतिहास हा केवळ पुस्तकातून वाचण्यापेक्षा ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्याने अधिकच उमजत जातो. अरुण बोऱ्हाडे यांनी केलेल्या भटकंतीतून अवगत झालेला इतिहास लालित्यपूर्ण शैलीतून पुस्तकात मांडला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.”
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बोऱ्हाडे यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या मनोगतातून अरुण बोऱ्हाडे यांनी, “छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेत जिंकलेल्या किल्ल्यांचा इतिहास रोमहर्षक आहे. जिंजीचा किल्ला म्हणजे सात किल्ल्यांचा दुर्गसमूह आहे. स्वराज्याची तिसरी राजधानी असलेल्या या किल्ल्याला प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून भेट द्यायला हवी. तितकेच महत्त्व वेल्लोरच्या किल्ल्याचे आहे. भारतातील सर्वाधिक बळकट आणि सुंदर भुईकोट किल्ला असून तो जिंकण्यासाठी मराठ्यांनी चौदा महिने वेढा घातला होता. पुढील तीस वर्षे तो मराठ्यांच्या ताब्यात होता. मराठ्यांच्या कर्तबगारीची साक्ष देणारी दक्षिणेतील तंजावर ही व्यंकोजीची राजधानी, तेथील बृहदेश्र्वर मंदिर हे खरे वैभव आहे. कला, साहित्य, सौंदर्य आणि शौर्याची प्रतीके म्हणून या स्थळांची माहिती देणारे ‘दुर्ग भटकंती : जिंजी, वेल्लोर, तंजावर’ हे पुस्तक इतिहासप्रेमी आणि गडकोट प्रेमी वाचकांना उपयुक्त ठरेल!” असे प्रतिपादन केले.
इंद्रायणी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि मोशी ग्रामस्थ यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी आभार मानले.