आंध्र प्रदेश (Pclive7.com):- तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यावं, अशी देशभरातील लाखो भाविकांची इच्छा असते. दररोज हजारो भाविक तिरुपती मंदिरात जाऊन बालाजी दर्शन घेतातही. तिरुपतीचं बालाजी मंदिर हे जागृत देवस्थान आहे. पण याच मंदिरात आज अतिशय मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आंध्र प्रदेशमधील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात वैकुंठद्वार दर्शनासाठी असलेल्या पास केंद्रावर चेंगराचेंगरी झाल्याने सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळपासूनच हजारो भाविक वैकुंठ द्वार दर्शनाच्या टोकन मिळवण्यासाठी तिरुपतीच्या विविध पास केंद्रांवर रांगेत उभे आहेत. या दरम्यान भाविकांना बैरागी पट्टीडा पार्क येथे पास घेण्यासाठी रांगेत उभं राहण्यास सांगितलं गेलं तेव्हा ही चेंगरा चेंगरी झाली ज्यामध्ये सहा भाविकांचा मृत्यू झाला.
मृत भाविकांमध्ये एका महिलेचा मृत्यू
चेंगराचेंगरीनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला. त्यात सहा भाविकांचा मृत्यू झाला. यामध्ये मल्लिका नावाच्या एका महिलेचा समावेश आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिरुपती पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी थोड्याच वेळात परिस्थितीवर नियंत्रणही मिळवलं.
चेंगराचेंगरीत काही भाविक जखमी..
चेंगराचेंगरीत अनेक भाविक आजारी पडले, काहीजण बेशुद्धही पडल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिरुपती देवस्थान समितीने १०, ११ आणि १२ जानेवारी रोजी वैकुंठद्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी १.२० लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता.