विद्युत पुरवठा, स्वच्छता गृह सुविधा तात्काळ पूर्ववत करण्याची सूचना
पिंपरी (Pclive7.com):- अजमेरा मासुळकर काॅलनी येथील डॉ. हेडगेवार मैदान आणि परिसरातील क्रीडा संकुलांमध्ये विद्युतपुरवठा खंडीत झाला होता. तसेच, स्वच्छता गृहाची दुरावस्ता झाली होती. याबाबत भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका संबंधित विभागाचे अधिकारी आणि महावितरण अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. तसेच, सदर सुविधा तात्काळ पूर्णवत करण्याची सूचना केली आहे.
अजमेरा मासुळकर कॉलनी येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या डॉ. हेडगेवार मैदान, स्केटिंग ग्राउंड, व्यायामशाळा, बॅडमिंटन हॉल या ठिकाणी गेल्या १५ दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला असून, स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, व्यायामास येणारी मुले यांची गैरसोय होत आहे. याच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार महेश लांडगे, अर्जुन ठाकरे, फारुक इनामदार, संजय साळुंखे, तुषार वाघिरे, वैशाली खाडे, संजय मगोडेकर, मोहन पवार, भावेन पाठक, विजय पवार, बबलू सय्यद, किरण पवार, मंगेश कुलकर्णी, माधुरी घोरपडे, माणिकराव अहिराव, हेमंत शिर्के, गणेश जाधव आदी उपस्थित होते.
अजमेरा मासुळकर कॉलनी परिसरातील सर्वसामान्य नागरिक आणि खेळाडुंच्या डॉ. हेडगेवार मैदान आणि या ठिकाणच्या क्रीडा संकुलांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे आंदोलनस्थळी भेट दिली. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संपर्क केला आणि तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना केली. यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सक्षमपणे पायाभूत सोयी-सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी आम्ही प्राधान्याने काम करीत आहोत.– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.