पिंपरी (Pclive7.com):- १ नोव्हेंबर २००५ पुर्वी पदभरती जाहिरात किंवा अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना (पेन्शन) लागू करण्यासह विविध विषयांस प्रशासक शेखर सिंह यांनी यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीत मान्यता दिली.
पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असणारे विविध विषय प्रशासक शेखर सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीत ठेवण्यात आले होते. यावेळी विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह संबंधित विभागांचे विभाग प्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील प्रभाग क्र. १० मध्ये मोरवाडी व इतर परिसरात पावसाळी गटारे स्वच्छ करणे, फुटपाथ विषयक कामे करणे तसेच प्रभाग क्र. २८ रहाटणी येथील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, प्रभाग क्र. १६ मधील किवळे येथील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील स्थापत्य विषयक कामे तसेच प्रभाग क्र. १७ मधील विविध ठिकाणी आवश्यकतेनुसार स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी झालेल्या बैठकीत मान्यता दिली.
नोंदणीकृत महिला बचत गटाला झोपडपट्टीतील सामुदायिक शौचालयाची साफसफाई आणि देखभालीचे काम देणे, नवी दिशा उपक्रम तसेच एस. आर. ए. प्रकल्पांतर्गत पुनर्वसन झालेल्या एच.ए ग्राउंड येथील रहिवासी भागातील दैनंदिन कचरा प्रभाग क्र. ८ येथील गुलाबपुष्प उद्यान येथील शून्य कचरा प्रकल्पात प्रक्रिया करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.