पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीला एचएमपीव्ही (HMPV) संसर्गाची दोन प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात वाघेरे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये एचएमपीव्ही या संसर्गाची दोन प्रकरणे समोर आली आहेत. या संसर्गाने नागपूर शहरामध्ये दोन लहान मुले प्रभावित झाले असून त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. संसर्गित मुलांमध्ये खोकला, ताप, आणि श्वास घेण्यास त्रास यांसारखी सर्दी सारखी लक्षणे आढळली आहेत. सतत श्वास घेण्यास होणाऱ्या त्रासामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतलेल्या चाचण्यांमध्ये HMPV संसर्गाची पुष्टी झाली आहे. या प्रकरणांमुळे आपल्या देखील शहरामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
देशभरात आतापर्यंत HMPV चे सात प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये बेंगळुरू आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन, नागपुरात दोन आणि अहमदाबादमध्ये एक प्रकरण समाविष्ट आहे. राज्यामध्ये HMPV प्रकरणे समोर येणे आरोग्य क्षेत्रासाठी गंभीर इशारा मानले जात आहे. हा विषाणू प्रामुख्याने मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रभावित करतो, तसेच संसर्ग झाल्यास श्वसनाचा गंभीर त्रास होऊ शकतो.
COVID – 19 च्या महामारीच्या काळामध्ये शहरातील अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. याची पुनरावृत्ती शहरांमध्ये पुन्हा होऊ नये म्हणून महापालिकेच्या वतीने वैद्यकीय आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवणे अत्यंत आवश्यक झालेले असल्याने आपण संबंधित विभागांना त्वरित निर्देश द्यावेत अशी आग्रही मागणी संदीप वाघेरे यांनी निवेदनात केली आहे.