पिंपळे सौदागर (Pclive7.com):- जगताप डेअरी चौका जवळ औंध – रावेत मार्गावर आज (दि.०५) सकाळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या आगीत ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी तात्काळ अग्निशामन दलाला संपर्क साधून घटनास्थळी दाखल केले होते.
आज सकाळी ५ च्या सुमारास या ट्रॅव्हल्सला आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. ही ट्रॅव्हल्स पुण्याहून पिंपरीच्या दिशेने येत होती. घटनेवेळी या ट्रॅव्हल्समध्ये पाच ते सहा प्रवासी आणि चालकासह दोन जण ट्रॅव्हल्स मध्ये होते. आग लागताच चालक आणि प्रवासी सर्वजण बाहेर आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच रहाटणी आणि थेरगाव येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दाखल होताच अग्निशामक दलाने काही वेळात ही आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
नाना काटे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला..
आज पहाटे ५ च्या सुमारास जगताप डेअरी येथे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. ही माहिती मिळताच माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी त्वरित अग्निशामक विभागाला कळवून अग्निशामक गाड्या बोलावून आग विझविण्यात आली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. तसेच नाना काटे सोशल फाऊंडेशन ची अँब्युलन्स देखील घटनास्थळी त्वरित हजर होती. या घटनेमध्ये कसलीही जीवितहानी झाली नाही. नाना काटे यांच्या तत्परतेचे सर्व नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.