भोसरी (Pclive7.com):- ऑनलाइन मागवलेल्या पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळला. या घटनेमुळे संबंधित कुटुंब आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भोसरी येथील इंद्रायणीनगरमध्ये शुक्रवारी (दि.३) रात्री हा प्रकार उघडकीस आला.
इंद्रायणीनगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे यांनी शुक्रवारी रात्री ५९६ रुपयांचा पिझ्झा ऑनलाइन मागवला. पिझ्झा मिळाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत पिझ्झाचा आस्वाद घेत होते. त्यावेळी त्यांना काहीतरी कठीण वस्तू दातात लागल्याचे जाणवले. तो चाकूचा तुटलेला तुकडा असल्याचे दिसून आले. या धक्कादायक घटनेनंतर अरुण कापसे यांनी तत्काळ पिझ्झा कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. मात्र सुरुवातीला त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर व्यवस्थापक कापसे यांच्या घरी आला. पिझ्झामधील तुटलेला चाकूचा तुकडा पाहून व्यवस्थापकही अचंबित झाला. पिझ्झा कट करण्याच्या कटरचा तो तुकडा असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर कापसे यांना पिझ्झाचे पैसे परत करण्यात आले.
संबंधित घटनेमुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने चिंता निर्माण झाली आहे. चाकूचा तुकडा पिझ्झामध्ये आढळल्याने ऑनलाइन पिझ्झा कंपनीच्या सेवेबद्दल आणि खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी कार्यवाहीसाठी, अरुण कापसे यांनी पुणे जिल्हा अन्न प्रशासनाकडे तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा प्रकारे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संस्थांवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी अन्न प्रशासन व पोलिसांकडे तक्रार करणार आहे. संबंधित पिझ्झा स्टोअरने या प्रकरणी तत्काळ पैसे परत केले असले, तरीही हा प्रकार त्यांच्या दर्जा नियंत्रण प्रक्रियेवर गंभीर प्रश्न निर्माण करतो.
– अरुण कापसे, ग्राहक, इंद्रायणीनगर, भोसरी.