पिंपरी (Pclive7.com):- स्थानिक शेतकरी, नर्सरी यासोबतच फुड प्रोसेसिंग कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी, शाश्वत पद्धतींचा प्रसार करण्यासाठी आणि निसर्गसंपत्तीच्या समृद्धतेचा उत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने फार्मर्स स्ट्रीट या दोन दिवसीय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा केवळ उपक्रम नसून ग्राहक आणि उत्पादक यांच्यातील नाते दृढ करण्याचा आणि शहरातील स्थानिक कृषी, व्यापारी समुदायाच्या उपजीविकेला पाठिंबा देण्याचा एक महत्वाकांक्षी प्रयत्न आहे, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्यान विभाग व मेसर्स पुणे अर्बनली संस्थेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथे ‘फार्मर स्ट्रीट’ चे आयोजन ४ व ५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, उद्यान अधिक्षक राजेश वसावे आदी उपस्थित होते.
लिनीअर गार्डन येथे भरविण्यात आलेल्या फार्मर्स स्ट्रीटवर शेतकऱ्यांकडून व रोपवाटिकांकडून थेट आणलेले नैसर्गिक आणि सेंद्रिय फळे, भाजीपाला, कृषी उत्पादने आणि हातकाम केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन नागरिकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय, नैसर्गिक सौंदर्यप्रसाधने आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स देखील येथे लावण्यात आले आहेत ज्याला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, आज सकाळी पिंपळेसौदागर येथील मल्टीफिट आणि मार्वेल या व्यायामशाळेतील प्रशिक्षकांनी फार्मर्स स्ट्रीट येथे नागरिकांसाठी मोफत झुंबा सेशन्स घेतले ज्याला नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दर्शविला. शिवाय, संध्याकाळी मावळा ग्रुपतर्फे लहान मुलांसाठी ‘रणांगण’ नावाच्या खेळाचेही आयोजन केले जाणार आहे, ज्यामध्ये मुलांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील युद्धकौशल्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
४ जानेवारी रोजी म्हणजे शेवटच्या दिवशी सकाळी नागरिकांसाठी मोफत योगा, ड्रम सर्कल व लाईव्ह सिंगिंगच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रात्री या उपक्रमाचा समारोप आमदार शंकर जगताप आणि आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्टॉलधारकांच्या प्रतिक्रिया..
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाने उत्पादक ते ग्राहक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे आमच्यासारख्या स्थानिक व्यापाऱ्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळाली असून त्यांचाही या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. यापुढेही असे उपक्रम राबविले जावेत अशी आमची इच्छा आहे.
– अमित सराफ, स्टॉलधारक, अनुस किचन
नैसर्गिक आणि सेंद्रिय उत्पादनांबद्दल नागरिकांचा असलेला उत्साह पाहून आनंद वाटला. महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या अशा उपक्रमांमुळे आम्हाला केवळ आर्थिक मदत होत नाही तर नैसर्गिक शेती आणि उत्पादन पद्धती अवलंबण्याची प्रेरणाही मिळते.
– शोभा राजळे, स्टॉलधारक, गुडवन सेंद्रिय गुळ
नागरिकांच्या प्रतिक्रिया..
‘फार्मर स्ट्रीट’ हा उपक्रम आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आम्हाला ताज्या भाज्या, व फळे आणि सेंद्रिय उत्पादने थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची संधी मिळाली. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात, अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी जोडला जाणारा थेट संवाद खूपच प्रेरणादायी आणि समाधानकारक वाटला.
– वैभव सिंग चौहान, आयटी प्रोफेशनल, पिंपळे सौदागर