पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह १६ नगरसेवकांनी काल मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली आहे. तर अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या उपस्थितीमध्ये निर्णायक बैठक झाली असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह १६ नगरसेवकांनी मोदीबागेत शरद पवाराची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे आणि माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष व पिंपरी-चिंचवड निरीक्षक प्रकाश म्हस्के उपस्थित होते.
भोसरी विधानसभेत ‘तुतारी’कडे कल..
अजित पवार गटातील भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. कारण, अजित गव्हाणे यांच्यासोबत विलास लांडे यांचा मुलगा माजी नगरसेवक विक्रांत लांडे बैठकीला उपस्थित होते. तसेच, लांडेंच्या सोबत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेवकांसह १५ पदाधिकारी ही शरद पवारांच्या तालमीत परतण्याचे निश्चित झाले आहे. लोकसभेत शरद पवारांचा चाललेला करिश्मा पाहून विलास लांडे घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र भोसरी विधानसभा विलास लांडे आणि त्यांचे नातेवाईक अजित गव्हाणे ही लढण्यास तीव्र इच्छुक आहेत. परंतु, महाविकास आघाडीमध्ये या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला आहे. परंतु, लांडे आणि गव्हाणे यांचा शरद पवार गटातील संभाव्य प्रवेश पाहाता ही जागा ‘तुतारी’वर लढण्याचे निश्चित झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे तीव्र इच्छुक सुलभा उबाळे आणि धनंजय आल्हाट यांची भूमिका काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.