पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर – रहाटणी येथील नागरिकांना मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी PMPML फिडर बससेवा सुरू करावी अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज (दि.०५) केली आहे.
शत्रुघ्न काटे यांनी PMPML वाहतूक व्यवस्थापक, स्वारगेट बस डेपो यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे की, दि.०१ ऑगस्ट रोजी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रो सेवेचे लोकार्पण झाले. या मेट्रो सेवेचा नागरिक जास्तीत जास्त प्रमाणात कसा वापर करतील अश्या पर्यायांचा विचार करणे अत्यावश्यक आहे.
प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर, रहाटणी मध्ये साधारण ६० ते ७० हजार नागरीवस्ती असून दिवसेंदिवस त्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पिंपळे सौदागर – रहाटणी परिसरातील नोकरदार वर्ग, शालेय विद्यार्थी, कॉलेजला जाणारा तरुण वर्ग तसेच महिला व जेष्ठ नागरिक हे दैनंदिन कामकाजासाठी पुणे शहरात ये-जा करीत असतात. प्रभागातून मेट्रो स्टेशनचे अंतर लांब अंतरावर आहे आणि पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील नागरिकांची या मेट्रो सेवेचा लाभ घेण्याची प्रबळ इच्छा आणि उत्साह आहे.
अश्या परिस्थितीत येथील नागरिकांना जर मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचवण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली तर पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील बरेचशे स्थानिक रहिवासी या मेट्रो सेवेचा नक्कीच वापर करतील. याचा फायदा मेट्रो रेल्वेला त्याचे उत्पन्न वाढण्यास सुद्धा होईल असा विश्वास शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी जसे PMPML मार्फत मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचण्यासाठी जी फिडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे, तसेच फिडर बस सेवा जर प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर- रहाटणी मधून सुरू केली तर नागरिकांना मेट्रो स्टेशन पर्यंत पोहचणे सोयीचे होईल.
म्हणून नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रभाग क्र.२८ पिंपळे सौदागर-रहाटणी येथून परिसरातील नागरिकांना मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचण्यासाठी PMPML मार्फत फिडर बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी PMPML वाहतूक व्यवस्थापक यांना दिले आहे.