पीटीआय, बंगळूरु (Pclive7.com):- ISRO Chandrayaan-3 Moon Mission Landing ४१ दिवसांचा अंतराळ प्रवास केल्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) ‘चंद्रयान-३’चे विक्रम लँडर आज, २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. त्यासाठी इस्रोचे संशोधक सज्ज झाले असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश बनणार आहे.
बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडरचे चंद्रपृष्ठावर सॉफ्ट लँडिंग करण्यात येणार असल्याचे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले. ‘चंद्रयान-३’ ही मोहीम यशस्वी झाली तर चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणारा भारत चौथा देश बनणार आहे. यापूर्वी अमेरिका, चीन आणि रशिया या देशांच्या अंतराळ यानाचे चंद्रपृष्ठावर लँडिंग करण्यात आले आहे. २०१९ मध्ये अपयशी ठरलेल्या ‘चंद्रयान-२’चीच पुढील मोहीम म्हणून ‘चंद्रयान-३’ मोहीम आखण्यात आली होती.
चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग, चंद्राचा अभ्यास आणि वैज्ञानिक प्रयोग करणे ही या मोहिमेची वैशिष्ट्ये आहेत. लँडिंगपूर्वी विक्रम मॉड्यूलची अंतर्गत तपासणी केली जाईल आणि ठरलेल्या लँडिंग स्थळी सूर्योदयाची प्रतीक्षा केली जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यापूर्वी ५.४५ वाजता लँडिंगची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित आहे, असे इस्रोच्या संशोधकांनी सांगितले.
अडचणी आल्यास लँडिंग लांबणीवर..
‘चंद्रयान-३’चे लँडिंग बुधवारी संध्याकाळी ६.०४ वाजता करणार असले, तरी काही अडचणी आल्यास लँडिंगची वेळ बदण्यात येऊ शकते, अशी माहिती इस्रोचे शास्त्रज्ञ नीलेश एम. देसाई यांनी दिली. बुधवारी सॉफ्ट लँडिंगमध्ये काही समस्या अथवा अडथळे आल्यास चंद्रपृष्ठावर यान उतरण्याची प्रक्रिया २७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली जाऊ शकते, असे देसाई यांनी सांगितले. ‘इस्रो’कडून यंत्रणेची नियमित तपासणी सुरू असून सर्व काही सुरळीत सुरू आहे. बुधवारी वेळापत्रकानुसारच सॉफ्ट लँडिंग करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही देसाई म्हणाले.