आळंदी (Pclive7.com):- पुण्यातील देवाच्या आळंदीतून वाहणारी अन् वारकरी सांप्रदायाचं श्रध्दास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. अक्षरशः नदीतून पाणी वाहतंय की साबणाचा फेस वाहतोय असा प्रश्न वारकरी आणि ग्रामस्थांना पडला आहे.

पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांचे हे पाप असल्याचं वेळोवेळी उघड झाल आहे. त्या कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीत सोडून वारकरी आणि ग्रामस्थांच्या जीवाशी खेळत आलेत. आषाढी वारी, कार्तिकी एकादशी, संजीवनी समाधी सोहळ्यासाठी येणारा वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतो. हेच पाणी तीर्थ म्हणूनही पितो. त्यामुळं त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेळोवेळी इंद्रायणी नदीला मोकळा श्वास मिळवून देण्याची भाषा केली आहे. अगदी या कंपन्यांवर गुन्हे ही दाखल केले गेले आहेत. पण परिस्थिती आज ही जैसे थेच आहे. गेली सात वर्षे यासाठी वारकरी आणि ग्रामस्थांनी लढा उभारला आहे, पण त्यांच्या पदरी आज ही निराशा कायम आहे.