आमदार महेश लांडगे यांचा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प; कौशल्य विकास केंद्रामुळे कुशल मनुष्यबळ निर्मितीला प्रोत्साहन
पिंपरी (Pclive7.com):- औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंटर सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पायाभूत सुविधा सक्षम करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली असून, सर्वसाधारण सभेत प्रस्तावित सेंटरच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे शहरात औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला असून, त्याला यश मिळाले आहे.
आमदार लांडगे यांनी पिंपरी-चिंचवड शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र (इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर) विकसित करावे. या करिता केंद्रीय कौशल्य आणि उद्योजकता धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली होती. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडेही याबाबत पाठपुरावा सुरू केला होता. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
चिंचवडमध्ये साकारणार ‘आयएसडीसी’
महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीसाठी चिंचवड येथील जुनी प्रीमियर कंपनीची २१ हजार १७२ चौरस मीटर जागा ताब्यात घेतली आहे. या ठिकाणी इमारत उभारण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे ‘इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट सेंटर’ च्या कामाला चालना मिळाली आहे.
औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडची ओळख ‘एज्युकेशन हब’ म्हणून व्हावी, असा आमचा संकल्प आहे. त्यामुळे जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, वायसीएम येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्राचे काम सुरू झाले. आता आगामी काळात आयआयएम, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय आणि कौशल्य विकास केंद्र उभारावे. यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. महापालिका प्रशासनाने या केंद्राच्या उभारणीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यास सकारात्मक भूमिका घेतली. याबद्दल प्रशासनाचे आभार व्यक्त करतो. आता कौशल्य विकास केंद्रासाठी सल्लागार नियुक्ती करावी. तसेच, निविदा प्रक्रिया राबवून दोन-तीन महिन्यांत कामाला सुरूवात करावी, अशी अपेक्षा आहे.– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.


























Join Our Whatsapp Group