पिंपरी (Pclive7.com):- पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी विक्री घोटाळ्यावरून चर्चेत आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा भागीदार, विक्रीदार आणि सह दुय्यम निबंधकावर अखेर महसूल विभागामार्फत बावधन पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.६) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, या प्रकरणात अमेडिया कंपनीचा दुसरा भागीदार असणाऱ्या पार्थ पवार यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अमेडीया एंटरप्राइजेस कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील, जमीन विक्रीदार कुलमुखत्यारधारक शितल किशनसिंह तेजवानी आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र बाळकृष्ण तारु अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सह जिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी दिग्विजय पाटील हे भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील ४० एकरांचा १ हजार ८०० कोटी रुपये किमतीचा भूखंड अवघ्या ३०० कोटी रुपयात विकत घेतल्याचा प्रकार समोर आला आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळपासून या प्रकरणात राजकीय आरोपांची राळ उठवली गेली. विरोधकांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या जमीन खरेदी विक्री नोंदणी करताना अनियमितता आढळून आल्याने सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यासह तहसीलदार यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात महसूल विभागामार्फत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत बावधन पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री फिर्याद दाखल करण्यात आली.

कोरेगाव पार्क येथील या जमीन खरेदी विक्री प्रकरणात ९ मे २०२५ मध्ये खरेदी खत नोंदवण्यात आले. जमीन खरेदी विक्रीचे दस्त करताना सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक होते. तसेच सह जिल्हा निबंधकांच्या आदेशान्वये खरेदी खत करताना सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरणे गरजेचे होते.
मात्र, खरेदी खत करताना आरोपींनी संगणमत करून शासनाची फसवणूक करून सहा कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले नाही. त्यामुळे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र. महसूल विभागाने फिर्याद देताना या गुन्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि अमेडिया कंपनीचे भागीदार पार्थ पवार यांना पद्धतशीरपणे बाजूला केल्याने चर्चांना उधाण आले आहे.
























Join Our Whatsapp Group