पिंपरी (Pclive7.com):- मुंबई, ठाणे परिसरात तब्बल २४ घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवडच्या वाकड पोलिसांनी जेरबंद केलं आहे. पिंपरी-चिंचवडमधील तक्रारदार अमेय विजय बिर्जे यांनी तक्रार दिली होती. त्यांच्या घरातील लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज आरोपी अब्दुल उर्फ चिरा इंद्रिस शेख आणि धर्मेश रामाचार्य दिवाकर यांनी घरफोडी करून चोरून नेला होता. या आरोपींना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
दिवाळीच्या काळात फिर्यादी अमेय यांच्या घरातील एक लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने कुलूप तोडून लंपास केले होते. अब्दुल उर्फ चिरा इंद्रिस शेख आणि धर्मेश राम आचार्य दिवाकर यांनी घरफोडी केली. दोघांनी मुंबई पालघर आणि ठाणे परिसरात तब्बल २४ घरफोड्या केल्याचं समोर आलं आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून दोघांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरात आपल्याला कोणी ओळखणार नाही आणि घरफोडी करून परत मुंबईत जाऊ असा गैरसमज आरोपींना होता. अखेर वाकड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
सदरची कारवाई वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विठ्ठल साळुंखे, सहायक पोलीस निरिक्षक संतोष पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण, सहायक पोलीस फौजदार विभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस हवालदार संदीप गवारी, बंदु गिरे, स्वप्निल खेतले, दिपक साबळे, अतिश जाधव, प्रमोद कदम, विक्रांत चव्हाण, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, राम तळपे, अजय फल्ले, भास्कर भारती, स्वप्निल लोखंडे, कांतेय खराडे, विनायक घारगे, रमेश खेडकर, सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी मिळून केली आहे.