पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर प्रभागातील बहुउद्देशीय मैदान विकसित करावे अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे की, पी.के. चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली HCMTR ची मोकळी जागा विकसित करावे. प्रभाग क्र.२८ रहाटणी पिंपळे सौदागरमध्ये असलेल्या HCMTR जागेत कोकणे चौक ते स्वराज चौक दरम्यान २ किमी लांब असे शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन तसेच विविध प्लाझा विकसित करण्यात आले आहे. याच शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन दरम्यान असलेल्या पी.के. चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान ४६३ मी.लांब असलेल्या क्षेत्रापैकी ९५ टक्के जागा ताब्यात असूनही अद्याप विकसित करण्यात आलेली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत सदर जागेत आपण BMX पार्क विकसित करणार होतो. परंतु या BMX पार्कचा फारसा वापर या प्रभागात होणार नसल्याचे दिसून आले. शहरात इतर दुसऱ्या ठिकाणी आपण BMX पार्क विकसित करण्याचा विचार करू शकतो. सदर जागा समतल प्रकारची असून याचा संपूर्ण उपयोग बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी केल्यास नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल असे मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले आहे.
पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली नागरी लोकवस्तीचा विचार करता, नागरीकांच्या सुखसुविधेच्या उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. अश्या परिस्थितीत सदर जागेचा उपयोग आपण बहुउद्देशीय टर्फचे मैदान किंवा ट्रीमिक्स पद्धतीने मैदाने विकसित करण्यासाठी करू शकतो. जेणेकरून याचा लाभ परिसरातील नागरिकांना घेता येईल. यासाठी विविध सुखसुविधा असलेली बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी एका चांगल्या आर्किटेक्टची नेमणूक करण्यात यावी. जेणेकरून सदर जागेचा पूर्ण नियोजनबद्ध आराखडा तयार करून एक बहुउद्देशीय मैदान नागरिकांसाठी विकसित करता येईल. पी.के. चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली HCMTR च्या मोकळ्या जागेत बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी महापालिका आयुक्तांच्याकडे केली आहे.