मुंबई (Pclive7.com):- शिवसेना कोणाची याचा फैसला पुढच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना कोणाची यावर २ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर ठाकरे तसंच शिंदे गटाकडून पक्ष तसंच चिन्हावर दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष तसंच धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं. मात्र याविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ज्यावर आता २ फेब्रुवारीला सुनावणी पार पडेल. या सुनावणीत ठाकरे गटाकडून काय युक्तिवाद केला जातो? आणि शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदार अपात्र सुनावणी..
शिवसेना आमदार अपात्रता निकाल १० जानेवारीच्या आत म्हणजेच पुढच्या दोन दिवसात लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता निकाल तयार केल्याचंही सूत्रांनी म्हटलंय. निकाल तयार आहे मात्र नार्वेकर सध्या नवी दिल्लीतल्या कायदे तज्ज्ञांशी चर्चा करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. राहुल नार्वेकर यांनी कालच यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आमदार अपात्रता निकाल १० जानेवारीच्या आत लागण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना कोणाची, कोणाचा व्हीप बरोबर या सर्व प्रकरणांमध्ये निकाल येण्याची शक्यता आहे.