पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षण आंदोलनाचा निर्णायक टप्पा म्हणून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे मुंबई येथे उपोषणाला बसणार आहेत. त्यासाठी ते जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून २० तारखेला निघणार आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांचे दि.२४ रोजी आगमन होणार आहे. त्यानिमित्त जरांगे- पाटील आणि आंदोलकांचे शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. ही पदयात्रा शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी मराठा स्वयंसेवक हजारोंच्या संख्येने मदत करणार आहे.
ही पदयात्रा बुधवारी (दि.२४) सकाळी सांगवी फाटा येथे येणार आहे. तिथून पुढे रक्षक चौक, जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, डांगे चौक, पदमजी पेपर मिलमार्गे चिंचवडगाव येथील चापेकर चौकात ही पदयात्रा येणार आहे. तेथून पुढे चिंचवड स्टेशन, खंडोबा मंदिर, आकुर्डी, निगडी, भक्ती-शक्ती समूह शिल्प, तळेगावमार्गे आंदोलक लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, ही पदयात्रा शहरात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाची (पिंपरी-चिंचवड) बुधवारी (दि.१७) चिंचवड येथील कै. दिनकर गजाबा भोईर व्यायामशाळा येथे बैठक झाली. या प्रसंगी प्रकाश जाधव, नकुल भोईर, राजाभाऊ गोलांडे, सतीश काळे, मारुती भापकर, वैभव जाधव, वसंत पाटील, मीरा कदम, संपतराव जगताप सुनिता शिंदे, राजेंद्र चिंचवडे, भूपेंद्र गावडे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वाहतुकीस कोणताही अडथळा न येता ही पदयात्रा पार पडावी, यासाठी नियोजन केले जाणार आहे. जागोजागी आंदोलकांना जेवणाची पाकिटे, पाणी बॉटल यांची व्यवस्था करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, सामाजिक मंडळे व दानशू व्यक्तींनी आपापल्या परिसरात पदयात्रा मार्गावर मदतकेंद्र उभारून मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांना आरोग्यविषयक कोणताही त्रास होऊ नये यासाठी खासगी डॉक्टर्स व सरकारी दवाखान्यांमार्फत जागोजागी आरोग्य मदत केंद्र उभारण्याचे देखील ठरविण्यात आले.
मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यानंतर विविध कमिट्या देखील बैठकीत बनविण्यात आल्या. तसेच, शहरातील विविध भागात नियोजनासाठी आवश्यक बैठक घेण्याचेही ठरले. प्रकाश जाधव यांनी प्रास्ताविक केले. वैभव जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर, नकुल भोईर यांनी आभार मानले.