पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी आणि कार्यकत्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे हेच आपल्या पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार असतील, अशी घोषणा पाटील यांनी केली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भोसरी विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष तुधार कामठे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सरचिटणीस जयंत शिंदे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, संघटक विवेक विधाते, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर प्रवक्ते माधव पाटील, माजी नगरसेविका सुलक्षणा धर, गणेश भोंडवे, मयूर जाधव, ज्योती जाधव यासह पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोशी येथे झालेल्या आढावा बैठकीत पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांमध्ये उत्साह भरत जयंत पाटील यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने बूथ बांधणी करण्यास सांगितले आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिचवड मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघातून भरघोस मते मिळवून देण्यासाठी बूथ बांधणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. येत्या पंधरा दिवसांमध्ये ४६४ बुथचे ४६४ अध्यक्ष नेमण्याचे आणि प्रत्येक अध्यक्षाकडे दहा सदस्यांची टीम तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बूथ बांधणीचा आढावा याच महिन्यात २५ तारखेला होणाऱ्या आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातून भरघोस लीड देऊ – तुषार कामठे
यावेळी बोलताना शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून पक्षाच्या उमेदवाराला भरघोस लीड देऊ, यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. येत्या पंधरा दिवसांमध्ये ४६४ बुथचे ४६४ अध्यक्ष नेमण्यात येतील. तसेच प्रत्येक बूथ अध्यक्षासोबत दहा सदस्य देण्यात येतील. याच प्रकारे विधानसभा निवडणुकीची देखील तयारी सुरू करण्यात येईल. लवकरच तीनही विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवार ठरवण्यासाठी यादी मागवून वरिष्ठांकडे पाठवून देण्यात येईल.