पिंपरी (Pclive7.com):- तरुणाला रिक्षातून आणून मोशी कचरा डेपोसमोरील ९० फुटी रस्त्यावर त्याचा खून करण्यात आला. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घडलेल्या या गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या दरोडाविरोधी पथकाने उलगडा केला. याप्रकरणी तीन जणांना अटक केली. रिक्षाचालकाला त्रास दिल्याने हा खून केल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
अमोल पवार असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत सुधाकर कांबळे (१९, रा. गुळवे वस्ती, भोसरी), शुभम अशोक बावीस्कर (२३, रा. धावडे वस्ती, भोसरी), विजय उमेश फडतरे (२२, रा. गायकवाड वस्ती, मोशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोशी कचरा डेपोसमोर तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला.
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेने केला. दरोडाविरोधी पथकाला माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित रिक्षातून चाकणच्या दिशेने जात आहेत. त्यानुसार पोलिसांनी चाकणच्या दिशेने जात असताना लांडगेनगर येथून संशयितांची रिक्षा पकडली. रिक्षातून प्रशांत कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दोन साथीदारांसह मिळून गुन्हा केल्याचे सांगितले.
सदरील कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश सावंत, सुमित देवकर, चिंतामण सुपे, पोलीस हवालदार माळी, व पोलीस शिपाई हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.