दोन कोटींचे ड्रग्स जप्त..
पिंपरी- चिंचवडमधील निगडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षकपदी विकास शेळके कार्यरत होता. प्रकरण उघड झाल्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले आहे. त्याच्याकडील ४४ कोटी ७९ लाखांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. त्यानंतर विकास शेळके याला अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने आपल्या कारमध्ये आणखी ड्रग्स असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोटारीतील ड्रग्स जप्त केले. दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन ड्रग्स हे होते. त्याची किंमत दोन कोटी रूपये आहे.
शेळकेने झा याला ड्रग्स विकण्यासाठी पाठवले..
मेफेड्रोन विकण्यासाठी रावेत परिसरातील एका नामचीन गुन्हेगारास विकास शेळके याने संपर्क केला. त्यासाठी नमामी झा याला त्या गुन्हेगाराकडे पाठवले. परंतु त्या गुन्हेगाराने सांगवी येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला याबाबत टीप दिली आणि प्रकार उघड झाला.
अटक न करण्यासाठी मागितले पैसे..
पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मागील महिन्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यातील संशयिताला शेळके याने नाशिक फाटा येथे बोलवले. त्यानंतर त्याचा मोबाइल काढून घेत अटक न करण्यासाठी त्याच्याकडे साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणात संबंधित व्यक्तीने तक्रार दिली आहे.