पिंपरी (Pclive7.com):- शेजारी राहणाऱ्या महिलेने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातून १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दिघी पोलिसांनी २४ तासांत या महिलेला अटक केली. तिच्याकडून १ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ३८ वर्षीय महिलेच्या घरातील १ लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले. याप्रकरणी त्या महिलेने दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरीचा हा प्रकार ९ ते १४ मार्च या कालावधीत घडला.
महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू केला. फिर्यादी महिलेच्या घरासमोर राहणाऱ्या महिलेची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असल्याचे पोलिसांना समजले. संशय आल्याने पोलिसांनी तिच्याकडे सखोल चौकशी केली. यावेळी तिने घरात कोणी नसताना उघड्या दरवाजावाटे घरात जाऊन दागिने चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी संशयित महिलेकडून ६० हजार रुपये किमतीचे मिनी गंठण आणि तीन तोळ्याचे मंगळसूत्र मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक अवधूत शिंगारे, वैशाली गुळवे, पोलीस अंमलदार किरण जाधव, कांचन पंडित यांच्या पथकाने ही कामगिरी केली.