पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा घोटाळा होणार असल्याचा आरोप बिनबुडाचे आहे. शवदाहिनीत भ्रष्टाचार करणा-या प्रशांत शितोळेंनी आमच्यावर टिका करू नये. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आलेली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. ‘बीव्हीजी’ तर राष्ट्रवादीची ‘पिलावळ’ असल्याची घणाघाती टिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी महापौर नितीन काळजे, नगरसेवक बाबा त्रिभुवन उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करुन तो मोशी कचरा डेपो येथे नेण्याच्या नव्या कंत्राटात २५२ कोटी रुपयांचा संभाव्य घोटाळा होणार आहे. शहराच्या दोन भागाची विभागणी करुन भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना लोकसभा, विधानसभा निवडणुकीचा खर्च काढायचा आहे. भाजपवाले ‘अँनाकोंडा’ असून कचर्यातले पैसे गिळून टाकत आहेत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. तसेच करदात्यांच्या पैशांची लूट कदापि सहन केली जाणार नाही. या निविदेमुळे महापालिका भिकारी बनणार आहे. त्यामुळे त्याची फेरनिविदा करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केली होती. त्याला आज सभागृह नेत्यांनी पत्रकार परिषेद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.
एकनाथ पवार म्हणाले, कचरा संकलन वहनाबाबत केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. राष्ट्रवादी पराभवाच्या गर्तेतून बाहेर आली नाही. त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे. आम्ही राष्ट्रवादीची अनेक प्रकरणे उघडकीस आणू शकतो. बीव्हीजी ही संस्था राष्ट्रवादीची पिलावळ आहे. बीव्हीजीला राष्ट्रवादीने महापालिकेला आंदण दिले आहे. महापालिकेच्या सर्वंच विभागातील कामे बीव्हीजीला दिली आहेत. या कामाबाबत महापालिका आयुक्त सविस्तर खुलासा करतील. राष्ट्रवादीने भाजपची बदनामी थांबवावी. अन्यथा राष्ट्रवादीची प्रकरणे बाहेर काढली जातील, असा इशाराच सभागृह नेते पवार यांनी दिला.