पिंपरी (Pclive7.com):- एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली कॅश घेऊन व्हॅनसह फरार चालकाला त्याच्या साथीदारांसह पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून ७४ लाख रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे. गुन्हा घडल्यानंतर पोलीसांनी आपली चक्रे फिरवत या गुन्ह्याचा ७२ तासात छडा लावला आहे.
एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले ७४ लाख रुपये घेऊन व्हॅन चालक व्हॅनसह फरार झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि. ३१) रोजी दुपारी दीडच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम शाखेजवळ घडली होती. या प्रकरणातील आरोपींना वाकड पोलिसांनी ७२ तासात जेरबंद केले असून त्यांच्याकडून ७४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
या कारवाईची माहिती देताना पोलीस उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले की, मुख्य आरोपी रणजित धर्मराज कोरेकर (रा. सनशाईन हॉटेलजवळ, माऊलीनगर दिघी मूळ रा. मु.पो. नारेवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर), असे या व्हॅन चालकाचे नाव आहे. तर त्रिंबक गणपती नहिराळे (वय ३७, रा. मांडवजाळी, ता. जि. बीड), अमोल लक्ष्मण धुते (वय २७,साई पार्क, माऊलीनगर, दिघी), विठ्ठल रामहरी जाधव (वय ३४, रा. लोळदगाव, ता. गेवराई, जि. बीड), अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर पूर्वी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
ब्रिक्स इंटरनॅशनल या कंपनीची गाडी (एम. एच.१४, सीएक्स ५७११) रणजित कोरेकर चालवत होता. बुधवारी सकाळी ही गाडी डेक्कन येथून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघाली. दुपारपर्यंत सात एटीएममध्ये पैसे भरण्यात आले. गाडीमध्ये सुरक्षा रक्षक, दोन कॅशियर आणि चालक असे चौघे होते. दुपारी सव्वाएकच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आल्यानंतर सुरक्षारक्षक आणि कॅशियर एटीएममध्ये रोकड भरण्यासाठी उतरले असता चालक रणजित कोरेकर याने गाडी घेऊन धूम ठोकली. यावेळी गाडीमध्ये ७४ लाख रुपयांची रोकड होती.
वरील आरोपी ईटीऑस कार (एम एच ४८, एफ १९८४) मधून पैसे असलेल्या वाहनाचा पाठलाग करीत होते. कॅश वाहन चोरण्याची संधी साधून चौघांनी मिळून भोसरी येथून सर्व कॅश ईटीऑस कारमध्ये ठेवून पळाले. बुधवारी रात्री उशिरा पळवून नेलेली व्हॅन भोसरी एमआयडीसी येथे एका कंपनीजवळ आढळून आली. मात्र, त्यामधील रोख रक्कम घेऊन चालक रणजित कोरेकर फरार झाला होता. गुरुवारी शिक्रापूर हद्दीत ज्या पेटीमध्ये कंपनीने पैसे भरून ठेवले होते, ती पैशांची पेटी सापडली. पण सापडलेली पेटी मोकळी होती.
काही वेळेच्या फरकाने एक-एक गोष्टी समोर येत असल्याने हा पूर्वनियोजित कट तर नसेल ना, अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यावरून वाकड पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले, व त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा गुन्हा उघडकीस आला. प्रकरणाचा ७२ तासांमध्ये तपास करत आरोपींना गजाआड करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे.