पुणे (Pclive7.com):- पुणे शहराचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे शनिवारी (दि.२७) दीर्घ आजाराने निधन झाले. मोहनसिंग राजपाल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यातच त्यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजपाल यांची पुण्याचे पहिले शिख महापौर अशी त्यांची ओळख होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचे विश्वासू म्हणून मानले जात. तसेच त्यांची ‘बाबुजी’ म्हणून ओळख होती.
मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. शहराचा मध्यवर्ती पेठांचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय प्रभागातून ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. १९९६-९७ वर्षानंतर २००९ साली महापालिकेचे पुरूष महापौर म्हणून काम करणारे राजपाल हे दुसरे महापौर ठरले होते. तसेच पुणे शहारातील शीख समाजाचे ते पहिले महापौर होते. पुणे महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना २००९ ते २०१२ या अडीच वर्षांसाठी राजपाल यांनी महापौर म्हणून जबाबदारी सांभाळली होती.