नाशिक (Pclive7.com):- नाशिकमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सराफा व्यावसायिकाच्या दुकानावर आणि डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापेमारी केली आहे. यात तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड आणि 90 कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले. यामुळे परिसरातील सर्वच व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिकमधील सुराणा ज्वेलर्स सराफी व्यावसायिकाच्या कॅनडा कॉर्नर येथील ज्वेलर्स दुकानासह आणि त्याच्याच डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून सलग 30 तास तपासणी केली. नाशिक, नागपूर, जळगावमधील आयकर पथकाने ही कारवाई केली. यावेळी जवळपास 50 ते 55 अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरु केले. त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथे असलेल्या आलिशान बंगल्यातही आयकर विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आलीत.
यासोबतच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.