वाकड (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वाकड येथील भुजबळ चौक-मधुबन हॉटेल शेजारी रस्त्यालगत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील आणि नवव्या मजल्यावरील अनधिकृत रूफटॉप हॉटेलवर शनिवारी (दि.२५) कारवाई करण्यात आली.
दुसऱ्या मजल्यावरील स्पाइस फॅक्टरी, अब्सोल्यूट बार्बेक्यू आणि नवव्या मजल्यावरील पब्लिक हॉटेल यांच्यावर महापालिकेने कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये अंदाजे ९ हजार चौरस फुट क्षेत्रफळाचे अनधिकृत रुफटॉप पाडण्यात आले आहेत. ही कारवाई आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार करण्यात आली.
महापालिकेच्या ‘ड’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्या नियंत्रणाखाली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भागवानी, उप अभियंता विजय भोजने, कनिष्ठ अभियंता अमोल पडलवार, सुहास भगत, ओंकार ताटे, शेषराव अटकुरे, अमोल शिंदे यांनी ही कारवाई पूर्ण केली. मजुरांच्या मदतीने आणि गॅस कटरचा वापर करुन ही कारवाई करण्यात आली. त्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त तैनात होता. ही कारवाई रविवारी (दि.२६) देखील चालूच आहे.