शेखर सिंह यांनी घेतलेले सर्व निर्णय, कामांचे फिजिकल ऑडिट करा; सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रशासकीय राजवटीत दोन ते अडीच हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी त्यांच्या राजवटीत घेतलेल्या सर्व निर्णयांची व झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी (फिजिकल ऑडिट) करावे. तसेच या चौकशीत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मारुती भापकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी १३ मार्च २०२२ पासून आजपर्यंत प्रशासक म्हणून जे निर्णय घेतले आहेत. ते निर्णय घेत विविध विकास कामांमध्ये सुमारे दोन ते अडीच हजार कोटींचे गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाले आहेत. या सर्व निर्णयाची व झालेल्या कामाची तज्ञ लोकांकडून पाहणी (फिजिकल ऑडिट) व्हावी. यामध्ये महापालिकेचे मुख्यालयाची इमारत, मोशी येथील हॉस्पिटल, अर्बन स्ट्रीट ,सिमेंट रस्ते विकास, रस्ते सुशोभीकरण, रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफ सफाई, विविध कामांसाठी रस्ते खोदाई, सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी, विविध विकास प्रकल्पाचे देखभाल दुरुस्ती, उद्यानाची नूतनीकरण दुरुस्ती, बहुचर्चित वाकड येथील सुमारे दीड हजार कोटीचा टीडीआर घोटाळा, ८ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर घेण्यात आलेले निर्णय व प्रत्यक्ष झालेले कामे, मोजमाप पुस्तिका, त्यानुसार संबंधित ठेकेदारांना अदा केलेली बिले याची सखोल चौकशी केली असता अनेक कामे बोगस पद्धतीने कागदावर दाखवून बिले लाटण्यात आली आहे. या निर्णयांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला असून या विषयांसह प्रशासक म्हणून काम करणाऱ्या आयुक्तांच्या सर्वच निर्णयाची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.
“परदेशवारी” आयुक्तांची सुट्टीच्या दिवशी स्टॅंडिंगची “बारी”
प्रशासकीय राजवटीमध्ये आयुक्त प्रशासक, महापौर म्हणून महापालिका सभा व स्टॅंडिंग कमिटी सभा मनमानी पद्धतीने घेतात. त्यांना कोणीही जाब विचारणारे नाही. प्रशासकीय पातळीवर पाच दिवसाचेच कामकाज होते. शनिवार रविवार सुट्टी असते असे असताना आयुक्त शेखर सिंग यांनी दि.११/०६/२०२४ ते दि.२८/०६/२ ०२६ अर्जित रजा मंजूर झालेले असताना आयुक्त शेखर सिंह यांनी सुट्टीच्या शनिवार दि.०८/०६/२०२४ या दिवशी स्टॅंडिंग कमिटीच्या बैठकीत ४५ विषयांना मंजुरी देताना सुमारे ११२ कोटी, २९ लाख, ८९ हजार, ३६९ हजार इतक्या रक्कमेची विकासकामे मंजूर केली. वास्तविक पाहता आयुक्त मंगळवार दि.११/०६/२०२४ रजेवर गेले आहेत. आयुक्त प्रशासकीय कामकाजाचा दिवस सोमवार दि. १०/०६/२०२४ स्टॅंडिंग कमिटी बैठक घेऊ शकत होते. मात्र आयुक्तांची त्यांच्या वारीसाठी सुट्टीच्या दिवशी त्यांनी खेळलेली स्टॅंडिंगची बारी मती गुंग करणारी आहे. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रशासकीय कार्यकालातील सर्व निर्णयांची तज्ञ लोकांमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून (फिजिकल ऑडिट) करून सखोल चौकशी करून दोषींवर कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.