पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी-वाकड रस्त्यावरील अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तब्बल २० दिवसांनी या अपघातासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर हिंजवडी पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी अपघातात जखमी झालेल्या तरुणीच्या भावाला बोलवून तक्रार घेतली आहे. या घटनेप्रकरणी उत्कर्ष परदेशी याने फिर्याद दिली असून वाहनचालक तुषार नेमाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद यांची बहीण आकांक्षा ही २३ मे २०२४ रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हिंजवडीकडून वाकडकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेने चालत जात होती. त्यावेळी या रस्त्यावरील बसथांब्याजवळ माउली स्नॅक्स दुकानासमोर आकांक्षा चालत जात असताना तुषार नेमाडे याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव आणि बेदरकारपणे चालवून आकांक्षा हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात आकांक्षा जखमी झाली होती.
२३ मे रोजी अपघात घडला, त्या दिवशी आकांक्षावर उपचार करण्यासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. अपघातानंतर तरुणी घाबरली होती. त्यानंतर तरुणी आणि तिचा भाऊ हे मुंबईला निघून गेले म्हणून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली. परंतु, सोशल मीडियावर सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर आज पोलिसांनी आकांक्षाच्या भावाला बोलवून तक्रार घेतली आहे.
याबाबत फिर्यादी उत्कर्ष परदेशी याबाबत म्हणाले, अपघातामध्ये माझी बहीण आकांक्षा हिला मुका मार लागला. त्यानंतर आम्ही मुंबईला आलो. ती सध्या नाॅर्मल असून काही दिवस आराम करण्याबाबत डाॅक्टरांनी सांगितले आहे. अपघात प्रकरणी आम्ही फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.