पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या सन २०२३-२०२८ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालकांमधुन आज (दि.२२) रोजी झालेल्या संचालक मंडळ सभेत पतसंस्थेच्या चेअरमनपदी चारुशिला किशोर जोशी, व्हा. चेअरमनपदी विजय मुरलीधर नलावडे, सेक्रेटरीपदी योगेश सुर्यकांत रानवडे व खजिनदारपदी विशाल बाळासाहेब भुजबळ यांची निवड संतोष लादे निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे शहर-१ यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी पतसंस्थेचे पदाधिकारी व विद्यमान संचालक यांनी अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली पतसंस्थेचा कारभार हा विनम्र आणि तत्पर सेवा व पारदर्शक व्यवहार व्यवस्थित रित्या चालविण्याचा संकल्प केला आहे. तसेच सभासदांना बचतीच्या सवयी लागण्यासाठी ठेवीवर जास्तीत जास्त ९% व्याज व कन्यादान ठेवीवर १०% ते १०.५०% व्याजदर करुन संस्था स्वभांडवलावर उभी करणेचे धोरण ठरविले आहे. तसेच सभासदांना कमीतकमी (११%) व्याज दराने कर्ज पुरवठा करून सभासदांच्या आर्थिक अडचणी दूर करणार आहोत. तसेच अध्यक्ष बबनराव झिंजुर्डे यांनी केलेली संस्थेची १५ वर्षापूवीर्ची वार्षिक उलाढाल रु.१७ कोटीच्या आसपास होती आता २० वर्षात संस्थेची वार्षिक उलाढाल रु. २०९ कोटींच्या वर झाली आहे व कर्ज मर्यादा रु. ५० हजारांहून रु. २० लाखापर्यंत वाढविले आहे. त्याची थकबाकी ०.४५% इतकी आहे. यावरुन संस्थेची आर्थिक स्थिती पाहता सस्थेला सतत ऑडीट वर्ग ‘अ’ वर्ग दर्जा मिळालेला आहे. संस्था स्थापनेपासून सलग ५० वर्ष नफा मिळवून नफ्यातून सभासदांना जास्तीत जास्त १४% व १२% लाभांश वाटप करून सभासदांना आर्थिक मदत करत आहे. संस्थेच्या सलग २५ वर्ष सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षिस म्हणून रुपये ५०००/- वाटप करीत आहे. तसेच संस्थेच्या मयत सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था आहे. सतत सभासदांच्या हितासाठी व तत्पर सेवेसाठी सदैव आग्रही आहे. संस्थेच्या आर्थिक उलाढाली मध्ये अधिकाधिक वाढ करणेचे व सभासदांच्या अडचणी दूर करणेचे संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालक मंडळाने एकविचाराने केला आहे.
यावेळी संस्थेचे विद्यमान संचालक व माजी पदाधिकारी सनी कदम, वैभव देवकर, विजया कांबळे, विश्वनाथ लांडगे, अनिल लखन, शिवाजी येळवंडे, संदीप कापसे, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, कृष्णा पारगे, गणेश गवळी, अभिषेक फुगे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय मुंडे, युनुस पगडीवाले व संस्थेचे सल्लागार मनोज माछरे, नितीन समगीर, संजय कापसे, मंगेश कलापुरे, उमेश बांदल, चंद्रशेखर गावडे, विशाल बाणेकर व प्रभागातील संघटनेचे पदाधिकारी व व्यवस्थापक प्रल्हाद सुतार तसेच महासंघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.