जोधपूर (Pclive7.com):- काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. अन्य चारही सेलिब्रिटी अभिनेते आणि अभिनेत्रींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. थोड्याच वेळात सलमानला शिक्षाही सुनावण्यात येणार आहे.
सुनावणी सुरू होताच सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे विचारण्यात आले होते. पण त्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते. अन्य सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. मात्र सलमानला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर अन्य कलाकारांना दोषमुक्त करण्यात आले. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला.
१९ वर्षांपूर्वी म्हणजे १९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता सलमान खान जोधपूरला आला होता. त्यावेळी काळवीटाची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्याच्या जीप्सीमध्ये अभिनेत्री निलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खानही होता. शिकार करण्यासाठी सलमानला भरीस घातल्याचा या कलाकारांवर आरोप ठेवण्यात आला होता.