पिंपरी (Pclive7.com):- इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्त्व गाजविणा-या सहा महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रसिध्द हॉकीपटू आणि सुसाईड प्रिव्हेन्शन संस्थेच्या संचालिका अरनवाझ दमानिया आणि इनरव्हील जिल्हा ३१३ च्या जिल्हा अध्यक्ष डॉ. सावित्री रघुपती यांच्या उपस्थित हा विशेष सन्मान सोहळा चिंचवडमधील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये पार पडला.
या प्रसंगी र्इनरव्हील जिल्हा ३१३ च्या माजी जिल्हा अध्यक्षा मंजू शर्मा, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा सविता राजापुरकर, सचिव सुमन शिरूर, रोटरी प्रेसिडेंट हेमंत कुलकर्णी, डॉ. रंजना कदम, सोनाली येवले, रेखा मित्रगोत्री, प्रतिभा दबलाल, सुजाता ढमाले, निर्मल कौर, कामलजीत कौर, आशा चौधरी, मुग्धा कुलकर्णी, रवी राजापुरकर, संजीव आलूरकर, राकेश सिंघनिया, शाम शिरूर आदी उपस्थित होते.
मराठी लेखिका व समीक्षक डॉ. वीणा देव (साहित्य), सकिना बेदी (अंधव्यक्तींसाठी समाज कार्य), शर्मिला सय्यद (अनाथांचे संगोपन), डॉ. ऋचा वाघ (स्त्री रोग तज्ज्ञ आणि बेटी बचाओ कार्य), अॅड. माधवी राहिरकर (वकील आणि समाजकार्य), मिशेल काकडे (असामान्य धावपटू) या महिलांना हिरकणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
दमानिया यांनी इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड च्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. तर, पुरस्कारार्थींनी आपल्या कार्याचा गौरव झाल्याची भावना पुरस्काराला उत्तर देताना मांडली. सन्मानपत्राचे लेखन व वाचन मुक्ती पानसे यांनी केले. प्रणिता आलूरकर यांनी सूत्रसंचालन केले. सविता राजपुरकर यांनी आभार मानले.