चिंचवड (Pclive7.com):- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास सुमारे १ लाख ७० हजार मतदार मार्गदर्शिका आणि ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार माहिती चिठ्ठ्या प्राप्त झाल्या आहेत. आत्तापर्यंत सुमारे ६८८ मतदार मार्गदर्शिका आणि २ हजार २३० मतदार चिठ्ठ्यांचे वाटप मतदारांना करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारांना मतदार माहिती चिट्ठी (पोल चीट) तसेच मतदार मार्गदर्शिका देण्यात येते. मतदार माहिती चिठ्ठीमध्ये नाव, परिसर, केंद्र, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रूम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती देण्यात आलेली आहे.
मतदार मार्गदर्शिकेमध्ये घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदी, नावनोंदणी प्रक्रिया, अर्ज भरण्याची प्रक्रिया, दिव्यांग मतदारांसाठी सूचना, मतदानाच्या दिवसापूर्वी काय करावे, मतदानाच्या दिवशी काय करावे, मतदान केंद्राची मांडणी, मतदान केंद्रांवरील चिन्हांचे फलक व त्यांचे अर्थ, मतदान प्रक्रिया, दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांसाठी, निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सुविधा, ईव्हीएमद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया, होम वोटिंग सुविधा, इसीआयचे सुविधा अँप, वोटर हेल्पलाइन अँप आदी बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ५६१ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी आणि मतदार मार्गदर्शिकेचे वाटप करण्यात येत असून याद्वारे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि नवमतदारांना मतदार माहिती चिट्ठी आणि मतदार मार्गदर्शिका वाटप करण्यावर भर दिला जात आहे, असेही श्री. पवार यांनी कळविले आहे.