पंतप्रधान मोदी यांनी दिला मावळातील भाजप मतदारांना थेट ‘संदेश’
पुणे (Pclive7.com):- मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांना आज भाजपचे सर्वोच्च नेते व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आशीर्वाद मिळाले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची आज (मंगळवारी) रात्री पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. या सभेतील भाषणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना शेळके यांची औपचारिक ओळख करून दिली. त्यावेळी नतमस्तक होऊन शेळके यांनी मोदी यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर हस्तांदोलन करत पंतप्रधानांनी शेळके यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, रामदास आठवले, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळमध्ये भाजपचे काही नेते महायुतीचे उमेदवार असलेल्या शेळके यांच्या विरोधात काम करीत आहेत. त्यामुळे सुरुवातीला भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते व मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिल्यानंतर मात्र चित्र बदलले. भाजपचे बहुतांश कार्यकर्ते आता शेळके यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या आशीर्वादामुळे तालुक्यातील भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना व मतदारांना योग्य तो संदेश गेल्याचे मानण्यात येत आहे.