पुणे (Pclive7.com):- सत्ताधारी विरोधकांच्या विरोधात उपोषणाला बसल्याची दुर्मिळ घटना आज संपूर्ण देशात अनुभवायला मिळत आहे, ती भाजप खासदारांच्या उपोषणाच्या माध्यमातून. आज पुण्यातही खासदार अनिल शिरोळे यांच्या नेतृत्वात एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे.
जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानाबाहेर आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे कार्यकर्त्ये या उपोषणात सहभागी झाले आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे उपोषण केले जाणार आहे.
विरोधकांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सत्र सुरळीत चालू दिले नसल्याचा ठपका ठेवत भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर हे उपोषण करण्यात येत आहे. विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे अधिवेशनाचे महत्वाचे दिवस वाया गेले. राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस वारंवार संसदेचे कामकाज बंद पाडून लोकशाहीचा अपमान करत असल्याचा आरोप देखील भाजपकडून करण्यात येत आहे.
संसदेचे कामकाज बंद पाडून जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा विरोधकांनी केल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group