पिंपरी (Pclive7.com):- वादाच्या भोवर्यात सापडलेले पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठवा अशी सूचना स्थायी समितीच्या बैठकीत विलास मडिगेरी यांनी केली. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या अडचणी वाढत आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झडल्या. सदस्य विलास मडिगेरी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी देखील त्यांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांविरोधात पत्रक काढून अफरातफरी केल्याचे गंभीर आरोप केले होते. तसेच यांच्यावर अॅट्रॉसिटीचा देखील गुन्हा दाखल झाला आहे. आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी ते कोर्टात गेलेत. चार्ज नसताना देखील त्यांच्याकडे हे पद आहे. प्रशासन, नगरसेवकांची त्यांनी फसवणूक केली आहे. खोट्या याचिका देखील त्यांनी दाखल केल्या असल्याचा आरोप मडिगेरी यांनी बैठकीत केला. म्हणूनच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची सूचना त्यांनी स्थायीच्या बैठकीत केली. आता हे रॉय यांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने याबाबत आयुक्त पुढील काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.