पिंपरी (Pclive7.com):- हिंजवडी जवळ असलेल्या कासारसाई येथील ऊसतोड मजुरांच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याबद्दल दोघांना अटक केली होती. याप्रकरणी धक्कादायक खुलासा पीडित मुलीने केला आहे. पीडित मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी तात्काळ आणखी दोघांना याप्रकरणी अटक केली आहे.
सुमीरन गुरुदास गायकवाड (वय १८), सोमनाथ अतिष वाघोले (२३, दोघे रा. दारुंब्रे, मावळ) या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. तर गणेश निकम (२२, रा. संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कर्मचारी वसाहत, कासारसाई) याच्यासह आणखी एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलास यापूर्वी अटक करण्यात आली आहे.
चॉकलेटचे अमिष दाखवून ऊसतोड मजुरांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना रविवारी (दि.१६) घडली होती. त्यातील एका मुलीचा मृत्यू झाल्याने बुधवारी (दि.१९) या घटनेला वाचा फुटली.
या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी पीडित मुलीकडे आणखी चौकशी केली असता तिने आणखी दोघांची नावे सांगितली आहेत. मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी तात्काळ दोघांना राहत्या घरातून अटक केली. हिंजवडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.