पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात धक्कादायक घटना समोर आली असून पतीच्या नात्यावरील विश्वास उडेल असे कृत्य केले आहे. हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच तिच्याकडे घटस्फोटाच्या मागणीसाठी तगादा लावत तो मिळवण्यासाठी तिच्या शरीरात ‘एचआयव्ही’चे विषाणू सोडण्यात आले.
याप्रकरणी पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय विवाहितेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर पडवळनगर, थेरगाव येथे राहणारा तिचा पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेचा विवाह २०१५ मध्ये झाला. त्यानंतर हुंड्यासाठी घरातील सासू, सासरे आणि पती यांनी व्यवसाय करण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी केली. त्यापैकी काही पैसे विवाहितेने दिले. मात्र त्यांची मागणी वाढत गेल्याने फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तिला शिवीगाळ करून मारहाणही करण्यात आली. विवाहितेकडून पैसे मिळत नसल्याने तिचा घटस्फोटासाठी छळ करण्यात आला. पीडित महिला आजारी असताना सलाईनमधून तिच्या शरीरात ‘एचआयव्ही’चे विषाणू सोडण्यात आले. यामुळे ती महिला ‘एचआयव्ही’ बाधीत झाली आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला पतीने स्वतःलाही ‘एचआयव्ही’ची लागण झाली असल्याचे सांगून मेव्हण्याला सांगून पत्नीची तपासणी करण्यास भाग पाडले. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक संगीता गोडे करीत आहेत.





















Join Our Whatsapp Group